ईद निमित्त डहाणू मित्रतर्फे हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश : फ्री मेहंदी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

Daily News

ईद निमित्त डहाणू मित्रतर्फे हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश : फ्री मेहंदी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
ईद-उल-अजहाच्या पार्श्वभूमीवर डहाणू मित्रचे संपादक रफिक घाची यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य फ्री मेहंदी कॅम्पला भगिनीच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध समाजातील महिलांनी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मेहंदीचा आनंद लुटला.
डहाणूमध्ये प्रथमच सर्व धर्मीय महिलांसाठी अशा प्रकारे मोफत मेहंदी कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याने कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली. हिंदू व मुस्लिम भगिनींनी एकत्र येत उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी सामाजिक सलोखा, बंधुता आणि ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
या उपक्रमासाठी यास्मिन शेख यांच्या यास्मिन हिना अकॅडमीच्या विद्यार्थिनींसह इतर मेहंदी कलाकारांनी विशेष सहकार्य करत महिलांना आकर्षक मेहंदी काढून दिली. दुपार पासूनच महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या मेहंदी कलाकार भगिनींचा आयोजकांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाला “हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक” असे संबोधत रफिक घाची यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी झरीन नेव्हिल पटेल (प्रेसिडेंट वुमन, डहाणू-पालघर, उज्वला डामसे , विश्वास निकम, रजनी ताजणे, मदन ताजणे, रिजवाना लियाकत शेख आदी महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सामाजिक ऐक्य, प्रेम आणि बंधुभाव जपणारा हा उपक्रम डहाणू शहरासाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *