डहाणू : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या इनरव्हिल क्लबच्या वतीने डहाणू फोर्ट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी क्लबच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना योग्य साधनसामग्रीच्या अभावी शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन इनरव्हिल क्लबने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व सोयीचा विचार करत हा सामाजिक उपक्रम हाती घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करून त्यांना नियमित शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाला इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा उज्वला डामसे, सचिव दक्षा जाधव, सी.सी. मनिषा गिरी, सदस्य राजर्षी कुलकर्णी व माधुरी देवकर, नगरसेविका स्नेहा मर्दे, पत्रकार रफिक घाची तसेच शाळेच्या शिक्षिका मोहिनी गुंजर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून अशा उपक्रमांची समाजात मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शाळेच्या शिक्षकांनी इनरव्हिल क्लबच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार मानले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

