डहाणू महोत्सव २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा आज (२० मार्च २०२६) रोजी सी व्ह्यू पार्क, पारनाका, डहाणू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. २० ते २२ मार्च दरम्यान रंगणारा हा महोत्सव डहाणूच्या समृद्ध संस्कृतीचा, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आणि स्थानिक कलेचा अनोखा संगम ठरणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली असून, संपूर्ण परिसर उत्साहाने आणि रंगतदार वातावरणाने फुलून गेला आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, क्रीडा उपक्रम, संगीत मैफिली यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला आणि शॉपिंग स्टॉल्सही नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहेत. डहाणूची खास ओळख असलेले चिकू उत्पादने, समुद्रकिनाऱ्याशी संबंधित वस्तू आणि आदिवासी कलाकुसरीला विशेष स्थान देण्यात आले आहे. महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे डहाणूची पर्यटनस्थळे, स्थानिक परंपरा, कला आणि समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य यांचा व्यापक प्रचार करणे हा आहे. यामुळे स्थानिक कलाकार, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठा व्यासपीठ मिळत आहे सर्वांमध्ये समन्वय राहून महोत्सव यशस्वी होईल. डहाणू महोत्सव २०२६ हा केवळ एक उत्सव नसून, डहाणूच्या ओळखीचा आणि विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

