गणेशोत्सव आणि कोकण यांचं एक अतूट नातं आहे. कामानिमित्त बाहेरगावी असणारे सर्व चाकरमानी गणेश उत्सवानिमित्त आपल्या घरी जाऊन आवर्जून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. कोकणातल्या या पारंपारिक उत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गावात अनोखा सोहळा अनुभवास येतो. गणपती आगमनापासून ते गणपती विसर्जनापर्यंत विविध प्रथा परंपरा याचा अनोखा संगम गावामध्ये दिसून येतो. केळशी या गावांमध्ये घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या सर्व गणेशमूर्ती या पर्यावरण पूरक अर्थातच शाडू मातीच्या असतात. गणपतीसाठी केली जाणारी आरास यामध्येही पर्यावरण पूरक साधनांचा वापर केला जातो. गणरायाचे वाजत गाजत पारंपारिक ढोल सनईच्या गजरात आगमन होत असते. यात कुठेही डीजे चा वापर केला जात नाही. दररोज घरोघरी आरत्या आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो. ज्येष्ठा गौरी यांचं आवाहन हे देखील पारंपारिक पद्धतीनेच होते.गौरी पूजनाच्या दिवशी पारंपारिक पलित्यांचा नाच हे केळशी गावाचे मुख्य आकर्षण आहे. हातामध्ये पटणारे पलिते घेऊन ढोलाच्या विशिष्ट तालावर नाचणारे मेळ हे एक विलोभानीय दृश्य आसते.
गणपती आगमन ते गणपती विसर्जन या दोन्ही मिरवणुकीमध्ये ढोल आणि सनई या पारंपारिक वाद्याचा वापर केला जातो. पर्यावरणाला साजेशी पारंपारिक प्रथा जपणारे आणि सण उत्साहात साजरा करणारे केळशी हे गाव कोकणातील गणेशोत्सवा मधील एक अग्रणी आणि सांस्कृतिक गाव मानले जाते.

