डहाणू :
डहाणू शहरातील ईराणी रोड परिसरात असलेल्या न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये भरदिवसा झालेल्या सशस्त्र चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे तब्बल ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी ४.३५ ते ४.४५ वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाचे मास्क व काळे जॅकेट परिधान केलेले अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन अनोळखी इसम न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये शिरले. त्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानमालक विनय कैलास सोनी यांनी प्रतिकार केला असता, आरोपींपैकी एकाने त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर आरोपींनी लाकडी मुठ असलेला मोठा लोखंडी सुरा वापरून दुकानातील काचा फोडून नुकसान केले आणि सुमारे ७०० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ९० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इमिटेशन ज्वेलरी घेऊन पसार झाले होते. या घटनेप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून तपासाला गती
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे तसेच डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा व डहाणू पोलिसांना तपासाच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.
त्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा माग काढला.
पहिला आरोपी २७ जुलैला अटकेत
तपासादरम्यान पोलिसांनी यशवंत सदू चौधरी (वय ४०) याला २७ जुलै २०२६ रोजी निष्पन्न करून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीत तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास पुढे नेत पोलिसांनी या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींचीही माहिती मिळवली.
आणखी दोन आरोपींना अटक
यानंतर दिपेश यशवंत गवळी (वय २२) आणि विशाल धाक्या चौरे (वय २३), दोघेही दाभोण, लहांगेपाडा परिसरातील रहिवासी, यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१(२) व २३८ ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
४२८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
अटक आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासातून पोलिसांनी ४२८.०५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून त्यांची किंमत ५१ लाख ५१ हजार १५० रुपये आहे. चोरीस गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अंकुर शेलार, डहाणू पोलीस ठाणे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, सपोनि योगेश शिंदे, पोउनि स्वप्नील सावंतदेसाई, पोउपनि रविंद्र वानखेडे, पोउनि रोहित खोत, पोउनि गोरखनाथ राठोड, पोउनि राजेश वाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाणे, पालघर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
भरदिवसा ज्वेलर्समध्ये शस्त्राच्या धाकावर झालेल्या या धाडसी चोरीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक करून लाखो रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केल्याने पालघर पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

