सोलसुंबा ग्रामपंचायतीचे सरपंच बळदेवभाई जशुभाई सुरती आणि उपसरपंच अमितकुमार मणीलाल पटेल यांना पुन्हा त्यांच्या पदावर रुजू करण्यात आल्यानंतर गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित मान्यवरांनी सरपंच व उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना उपसरपंच अमितकुमार पटेल यांनी मागील घडामोडींवर किंवा कोणावरही टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आता पुढील काळात सोलसुंबा गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “जे काही झाले ते विसरून नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे. ग्रामपंचायतीसमोर असलेली प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, प्रलंबित विकासकामे तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. कोणतेही विकासकाम अडथळ्यांमुळे रखडू नये, तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सरपंच बळदेवभाई सुरती व उपसरपंच अमितकुमार पटेल यांच्या पुनर्रुजू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामकाजाला पुन्हा गती देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबरोबरच गावाच्या विकासासाठी नव्या नियोजनातून काम करण्याबाबतही चर्चा झाली.
दरम्यान, सरपंच व उपसरपंच यांचे ग्रामपंचायत सदस्य तसेच उपस्थितांनी केलेले स्वागत आणि बैठकीत व्यक्त झालेल्या सकारात्मक विचारांमुळे ग्रामपंचायतीच्या आगामी कामकाजाबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.

