डहाणू : तालुक्यातील मसोली येथे राहणारी अवघ्या ११ वर्षांची गुणी नृत्यांगना हिया कुणाल माळी हिचे दि. २२ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. इतक्या कमी वयातच आपल्या अद्वितीय नृत्यकौशल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर ठसा उमटवणाऱ्या हियाच्या आकस्मिक जाण्याने डहाणू शहरावर शोककळा पसरली आहे.
हियाची अंत्ययात्रा दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता मसोली येथून निघाली. यावेळी डहाणूतील प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संस्था, कला क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अल्पवयातच हियाने आपल्या नृत्यकलेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारात तिने विशेष प्राविण्य मिळवले होते. तसेच गरबा स्पर्धांमध्ये ती ‘गरबा क्विन’ म्हणून ओळखली जात होती. विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने अनेक पदके व सन्मान प्राप्त केले होते. तिच्या मेहनतीने आणि कलागुणांनी डहाणूचे नाव राज्य व देशभर उज्ज्वल केले होते.
हियाचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, हसतमुख होता. अभ्यासासोबतच कलेतही ती तितकीच प्रगल्भ होती. तिच्या उज्ज्वल भवितव्याच्या अनेक स्वप्नांना या अकाली मृत्यूने विराम मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. “काळ कधी येतो सांगता येत नाही,” अशी हळहळ नागरिक व्यक्त करत आहेत.
या दुःखद घटनेमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डहाणूकर त्यांच्यासोबत दुःखात सहभागी झाले आहेत. विविध स्तरांतून शोकसंदेश व्यक्त करण्यात येत असून हियाच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, तसेच तिच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना सर्वत्र करण्यात येत आहे.
हियाच्या रूपाने डहाणूने एक उज्ज्वल, उमलती कला कळी गमावली आहे. तिची आठवण तिच्या नृत्यातून, मिळवलेल्या सन्मानातून आणि तिने जिंकलेल्या प्रत्येक हृदयातून कायम जिवंत राहील.

