पालघर दि 30 : दिनांक 30/ 10/ 2024 रोजी तलासरी, उधवा तपासणी नाका, येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जी जे 0 1 जे टी 88 48 टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर रकमेची वाहतूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सिल्वासा शाखेच्या एटीएमच्या वाहनाचा वापर करून हे पैसे महाराष्ट्रात आणण्यात येत असताना पोलिसांच्या तपासणी दरम्यान तलासरी तालुक्यातील उधवा तपासणी नाका येथे जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने हस्तगत करण्यात आलेल्या रकमेविषयी वाहनचालकाला या संदर्भात योग्य ते उत्तर न देता आल्यामुळे सदरील रक्कम सील करून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक अनिल लाड , पोलीस निरीक्षक विजय मुतडक ,पोलीस उपनिरीक्षक कुणाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अशा प्रकारची कुठलीही कारवाई अपील करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून त्याचे प्रमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे असून जिल्हा समन्वय अधिकारी खर्च नियंत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7588546013 असा आहे तरी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच कुणीही विनापरवाना 50 हजारा पेक्षा अधिक रोख रक्कम जवळ बाळगू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.
या पूर्वी दिनांक 23 /10/ 2024 रोजी स्थिर संनिरीक्षण चमू ( SST )मार्फत रुपये 3 लाख 27 हजार 500 रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आली असून सदरील रक्कम कोषागार कार्यालय, पालघर येथे जमा करण्यात आली आहे. दिनांक 27/ 10/ 2024 रोजी SST मार्फत बोईसर येथून रू 4, लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली असून कोषागार कार्यालय ,पालघर येथे जमा करण्यात आली आहे.
तसेच दिनांक 26/ 10 /2024 रोजी भरारी पथका मार्फत तपासणी नाका,दापचारी, तालुका तलासरी येथून निवडणुक विषयक साहित्य मफलर ,टोप्या ,झेंडे व गमछे इ.साहित्य अंदाजित रू.12, लाख 43, हजार इतक्या रकमेचे साहित्य जप्त करण्यात आले असून कोषागार कार्यालय पालघर येथे ठेवण्यात आले आहे.

