भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रातील बहुताश जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यात सुद्धा सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विस्तारीत श्रेणी हवामान अंदाजानुसार ९ ते १५ ऑगस्ट, १६-२२ ऑगस्ट आणि २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसेच ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचे किमान तापमान सरासरी पेक्षा कमी, आणि कमाल तापमान ९-१५ ऑगस्ट आणि १६-२२ ऑगस्ट पर्यंत सरासरींएवढेच आणि शेवटच्या आठवड्यात (२३ ते २९ ऑगस्ट) सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पालघर जिल्ह्यात १ ते १२ ऑगस्ट पर्यंत सरासरी २५९.२ मिमी पाऊस पडतो आणि यावर्षी 232.0 (८९.५ %) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्याची १ जून ते १२ ऑगस्ट पर्यंत एकूण पावसाची सरासरी आकडेवारी १५७६.१ मिमी आहे, आणि यावर्षी १७३५.२ (११०.१%) पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन आठवडे हलक्या ते मध्यम आणि तेही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला असल्याने भात लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बांधबंधिस्ती करून पावसाचे पाणी बांधून ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. भात खाचरात पाणी साचून न राहू देता ते वाहते ठेवावे. भाजीपाला, फळबागा व इतर खरीप पिकातील तण व्यवस्थापन करून घ्यावे, जेणेकरून पिकाबरोबर तणाची स्पर्धा कमी होवून जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहू शकतो. पिकावर रोग व किडीच्या प्रादुर्भाव झाल्यास कृषि शास्त्रज्ञाचा मार्गदर्शन घ्यावे व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.
|
|

