डहाणूतील मानाचा आणि आकर्षक गणेशोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामवाडी मित्र मंडळाच्या सात दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणरायाच्या दर्शनासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
ढोल-ताशांचा गजर, विविध वाद्यांचे आकर्षक सादरीकरण, गणपती बाप्पाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. **‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’**च्या जयघोषात भक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी सागर नाका येथे उपस्थित भाविक, नागरिक, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. यावेळी डहाणू नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांचीही उपस्थिती होती.
रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असून, यंदाही सात दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विसर्जन सोहळा शांतता, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी डहाणू रोटरी क्लब ऑफ सी कॉस्ट यांच्या वतीने भरतभाई राजपूत आणि जगदीश राजपूत यांचे स्वागत करण्यात आले.

