डहाणू : डहाणूकर जनतेने नगराध्यक्षपदी राजेंद्र माच्छी यांना विराजमान केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली डहाणू नगरपरिषद कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन दि. ०३/०२/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. या शुभारंभाच्या कार्यक्रमात डहाणू शहरातील विकासाचा नवा मार्ग खुला होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजू माच्छी यांनी नगरपरिषद हद्दीतील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांची घोषणा केली. यामध्ये, मौजे आगर येथील बालोद्यान पासून वावरपाडा भगवान कडू यांचे घराकडे जाणारा रस्ता आणि गटार काम, तसेच आगर-वाजीयापाडा येथील नलिनी गुराडा यांचे घर ते एस. व्हि. एम. हॉल कडे जाणारा रस्ता व गटार काम यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरील डॉमिनोज ते वासंती अपार्टमेंट पर्यंत काँक्रीट रोड आणि पाईप गटार, ओशियन अपार्टमेंट ते विद्युतनगर पर्यंत पाईप गटार तसेच पटेलपाडा ते टंकरपाडा रस्त्याचे काम यांचेही भूमिपूजन करण्यात आले.
याशिवाय, केनाडला जाणारा रस्ता, फुगा कंपनी पासून ते स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता आणि रुस्तम इराणी यांचे वाडी पासून पाटीलपाडा कडे जाणारा रस्ता तयार करण्याचेही उद्दिष्ट ठेवले आहे.
या विशेष भूमिपूजन सोहळ्यात आमदार विनोद निकोले, शिवसेना पालघर जिल्हा शिंदे गट अध्यक्ष कुंदन संखे, नगराध्यक्ष राजेंद्र लखू माच्छी, रविंद्र फाटक, अमित नाहार, रुपजी कॉल यांच्यासह स्थानिक नगरसेवक, नगरसेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांमध्ये उत्साह व समाधान व्यक्त होत आहे, कारण त्यांना आता शहरातील विविध ठिकाणी आणि रस्त्यांवर उत्तम दर्जाच्या इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांचा लाभ मिळणार आहे. नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्या नेतृत्वाखाली हे विकासकामे डहाणूच्या एकंदरीत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

