शिक्षणमहर्षी रजनीकांत श्रॉफ यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा चिंचणी येथे उत्साहात संपन्न

शिक्षणमहर्षी रजनीकांत श्रॉफ यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा चिंचणी येथे उत्साहात संपन्न :

Daily News
चिंचणी ( वार्ताहर ):
अभिष्टचिंतन सोहळा समिती व दी चिंचणी-तारापूर एज्युकेशन सोसायटी, चिंचणी यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीचे चेअरमन शिक्षणमहर्षी रजनीकांतभाई श्रॉफ यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतनाचा तसेच रजनीकांतभाई श्रॉफ व त्यांच्या पत्नी व संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ या उभयतांच्या जीवनकार्यावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड़ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर संस्थेचे अध्यक्ष अजितभाई कापडिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. सुचिता करवीर यांनी संस्थेच्या नियोजन व व्यवस्थापनातील पंचसूत्री, संस्थेमार्फत राबविले जाणारे दहा ज्वलंत उपक्रम तसेच शिक्षण व समाजासाठी संस्थेची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. यावेळी “तमसो मा ज्योतिर्गमय – रजनीकांत-रमिला” या संयुक्त गौरवग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड़ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच प्रसंगी रजनीकांत श्रॉफ यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास व्रज पटेल, राजेश आक्रे, शशिकांत सिंह, दीपक भावे, भारतेंदू महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी, चिं.ता.ए. सोसायटीमार्फत शासननियोजित तसेच संस्थेच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध समाजोपयोगी उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. भविष्यात या संस्थेसोबत विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांमध्ये प्रशासन निश्चितच सहभागी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच महाविद्यालय व परिसरातील विद्यार्थ्यांना विविध विकास प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. संपादकीय अण्णा डोंगरदिवे यांनी मांडले. या सोहळ्यास रजनीकांतभाई श्रॉफ यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, आप्तेष्ट, पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी, संस्थेचे आजी व माजी विद्यार्थी तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्यक्ष उपस्थितीबरोबरच संदेश व दृकश्राव्य माध्यमांद्वारेही अनेक मान्यवरांनी रजनीकांतभाई श्रॉफ यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना रजनीकांतभाई श्रॉफ यांनी, प्रत्येकाने आपले कार्य जबाबदारीने पार पाडावे तसेच विद्यार्थीभिमुख व समाजाभिमुख कार्य करून सामाजात लौकिक मिळवावा, असा मौलिक संदेश उपस्थितांना दिला. यावेळी डॉ. रमिलाबेन श्रॉफ यांनी सत्काराला उत्तर देताना, एका व्यक्तीसाठी व्यक्त होणारे एवढे प्रेम हे एकजुटीचे व सामाजिक सलोख्याचे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *