आश्रम शाळेतील मुलांना ताजे गरम आणि सकस अन्न मिळावे तसेच मुलांचे आरोग्य जपले जावे यासाठी आश्रम शाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सुचविले आहे.
काल दिनांक काल दिनांक ६/८/२०२४ रोजी डहाणू प्रकल्पातील रणकोळ, लालठाणे, नंडोरे आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली,त्या अनुषंगाने आज अध्यक्ष प्रकाश निकम यांनी कासा, येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि रणकोळ आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच कांबळगाव येथील सेंट्रल किचन ची पाहणी केली.
अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सेंट्रल किचन मधे जाऊन अध्यक्ष प्रकाश निकम यांनी संपूर्ण किचन ची प्रक्रिया जाणून घेतली.किचन मधली स्वच्छता,वापरण्यात येणारे,साहित्य याची पाहणी केली.
विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणारे जेवण कसे असते हे पाहण्यासाठी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चपात्या या कच्च्या असतात असे त्यांच्या लक्षात आले तसेच विद्यार्थ्यांना विचारता विद्यार्थ्यांनी देखील चपात्या कच्च्या असल्यामुळे आम्ही खात नाहीत हे मान्य केले.यावर किचन चे अधीक्षक आणि कर्मचारी यांना चपात्या व्यवस्थित शिकवण्यात याव्यात आणि जेवणाची चव सुधारावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी लांब नेण्यात येणारे अन्न हे उशीर झाल्याने आंबते, जेणे करून असे प्रकार उद्भवतात त्यामुळे प्रत्येक तालुका स्तरावर एक छोटे किचन असावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे यावेळी अध्यक्षांनी सांगितले.
रणकोळ आश्रम शाळेत एकूण 1014 पट असून 764 विद्यार्थी हे बाहेरून येणारे आहेत. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आश्चर्यजनक खेद व्यक्त केला.
आदिवासी विकास विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळा हे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वरदान असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आश्रम शाळेत राहून आश्रम शाळेचा लाभ घेतला पाहिजे, असे असताना या आश्रम शाळेत वसतिगृहात राहणारी मुलांची संख्या ही अत्यल्प असणे ही गंभीर बाब असल्याचे यावेळी अध्यक्ष निकम यांनी सांगितले.

