डहाणू, दि. १० सप्टेंबर २०२६ : डहाणू तालुक्यातील आशागड-धोडीपाडा परिसरात पैशांवर सुरू असलेल्या कथित अवैध जुगार अड्ड्यावर डहाणू पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ९१ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास आशागड, धोडीपाडा येथील प्रकाश धोडी यांच्या उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये काही जण पैशांवर अवैधरित्या जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती डहाणू पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नागनाथ लाड यांनी पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन पंचांच्या उपस्थितीत शेडवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी रामप्रवेश ओमप्रकाश चौधरी, भरत प्रजापती, संजय कांबळे, दीपक धोडी, तुषार पाटील, गुड्डू हारवाला, पप्पू परमार, नितेश अलोने, चेतन चव्हाण तसेच तीन अनोळखी इसम असे एकूण व्यक्ती जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे सांगण्यात आले.
या छापा कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ९१,६७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार संकेत गाडीलकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३१/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
अवैध जुगाराविरोधात पोलिसांची धडक मोहीम
डहाणू तालुक्यात अवैध जुगार, मटका आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. आशागड येथील ही कारवाईदेखील त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे दिसून येते. पोलिसांच्या सातत्यपूर्ण धडक कारवाईमुळे अवैध जुगार चालविणाऱ्यांवर वचक निर्माण होत असून, अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नागनाथ लाड, पोलीस उपनिरीक्षक दिनेश आघाव, पोलीस हवालदार समीर मासमार, पोलीस नाईक स्मितेश रावते आणि पोलीस अंमलदार केदा बर्वे यांनी सहभाग घेतला.

